५ लाखांची लाच मागणाऱ्या API वर गुन्हा दाखल
अर्जातील तक्रार दिवाणी स्वरूपाची दाखविण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १० लाखांची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पितापुत्रांविरुद्ध आलेल्या अर्जातील तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे दाखवून अर्ज निकाली काढण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १० लाख रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तानाजी शिवाजी कदम (रा. रुग्णाल गेट वे सोसायटी, रावेत) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तानाजी कदम हा चाकण उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
याबाबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ५४ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार व त्यांचा मुलगा यांच्याविरोधात जमीन खरेदी-विक्री व्यवसायाच्या अनुषंगाने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दोन तक्रार अर्ज आले होते.
या तक्रार अर्जांची चौकशी करण्याचे काम तानाजी कदम याच्याकडे सोपविण्यात आले होते. हे दोन्ही तक्रार अर्ज वरिष्ठांना सांगून दिवाणी स्वरूपाचे असल्याचे दाखवून निकाली काढण्यासाठी तानाजी कदम याने वरिष्ठांच्या नावाने १० लाख रुपयांची लाच मागितली.
याबाबत १३ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी निगडी येथील श्रीकृष्ण व्हेज हॉटेलमध्ये त्याच दिवशी करण्यात आली.
त्यावेळी तानाजी कदम याने दोन्ही अर्ज वरिष्ठांकडून निकाली काढण्यासाठी तक्रारदाराकडे प्रथम १० लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ५ लाख रुपयांची मागणी केली.
तसेच पहिल्या टप्प्यात अडीच लाख रुपये आणि तक्रारदाराविरुद्ध आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये देण्याची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले होते.
त्यानंतर पुढील कारवाई झाली नाही. मात्र, पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक तानाजी कदम याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तानाजी कदम याचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी केली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत.
