आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नागालँडमधील तस्कराला पुण्यात अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 15, 2026
Spread the love

पुणे : पुण्यात राहून नागालँडमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे रॅकेट चालविणाऱ्या एका तस्कराला अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने पुण्यातील हांडेवाडी येथून अटक केली आहे.

याका अहोके आवोमी (वय ३०, रा. किंगस्टोन सिरीन सोसायटी, हांडेवाडी) असे या तस्कराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला पकडून नागालँड पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. ट्रान्झिट वॉरंट घेऊन पोलीस त्याला दिमापूरला घेऊन रवाना झाले. अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याका आवोमी याच्याविरुद्ध दिमापूर वेस्ट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तो पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती नागालँड पोलिसांना मिळाली होती. नागालँड पोलीस दलाच्या पोलीस महासंचालकांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना ही माहिती देऊन तपासात सहकार्य करण्याची विनंती केली.

महासंचालक दाते यांनी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, पोलीस अंमलदार भारत साळवे आणि योगिता शिंदे यांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय बातमीदारामार्फत त्याचा शोध घेतला.

त्यावेळी तो राहत असलेल्या हांडेवाडी येथील किंगस्टोन सिरीन सोसायटीची माहिती मिळाली. तो तेथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याला पकडले.

पुढील कारवाईसाठी त्याला नागालँड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागातील पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.