आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल व्यावसायिकावर खुनी हल्ला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 15, 2026
Spread the love

पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरुद्ध फिर्याद देणाऱ्या मोबाईल व्यावसायिकावर आठ ते दहा जणांनी कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक कारणातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. शास्त्रीनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शिंदे यांचा मेहुणा ऋषिकेश शिरगावकर, प्रशांत धुमाळ, प्रशांत नवघणे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शिंदे यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये जबरदस्तीने गर्भपात केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात अमित शिंदे यांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अमित शिंदे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा अर्ज यापूर्वीच पोलिसांकडे दिला आहे.

कर्वे रोडवरील कोकण एक्सप्रेस हॉटेलसमोर अमित शिंदे यांचे ‘विघ्नहर्ता’ नावाचे मोबाईलचे दुकान आहे. अमित शिंदे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकानाबाहेर उभे असताना अचानक आठ ते दहा जण तेथे आले.

त्यांनी अमित यांच्या डोक्यावर आणि हातांवर सपासप वार केले. त्यानंतर ते पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत अमित यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या डोक्यावरील जखमेवर चार टाके घालण्यात आले.

उजव्या आणि डाव्या हातांवरील जखमांवर अनुक्रमे चार व पाच टाके घालण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी सकाळी अमित शिंदे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप येसाने तपास करीत आहेत.