बार्शी शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा
पोलीस प्रशासन, सायबर सुरक्षा व शस्त्रसामग्रीची माहिती : अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, पोलीस प्रशासनाचे कार्य समजावे तसेच पोलीस दलाविषयी विश्वास व आदर वाढावा या उद्देशाने नवीन मराठी शाळा, बार्शी येथील इयत्ता ५ वी ते ७ वी सेमी इंग्रजी (विनाअनुदान) वर्गातील विद्यार्थ्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याला शैक्षणिक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार व पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या अभ्यासदौऱ्यास नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुरलीधर आगावणे यांच्यासह शिक्षक वैजिनाथ मोरे, आकाश धावणे तसेच शिक्षिका ईश्वरी जोशी व संध्या खुटे उपस्थित होते. पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पोलीस ठाण्याची रचना, विविध शाखांचे कार्य, पोलीस दलाची जबाबदारी, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
निर्भया पथकाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्रता गटकुळ यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून दिली.
यामध्ये अर्ज शाखा, गोपनीय शाखा, नगदी कक्ष, मुद्देमाल कक्ष, गुन्हे प्रकटीकरण शाखा, महिला संरक्षण कक्ष, बाल कायदा पथक, निर्भया महिला सुरक्षा पथक, सायबर कार्यालय, वाहतूक शाखा, वायरलेस रूम तसेच पुरुष व महिला आरोपी लॉकअप यांची माहिती देण्यात आली.
प्रत्येक शाखेचे कार्य, तक्रारींची नोंद व त्यावरील कार्यवाही, जप्त मुद्देमालाची सुरक्षित हाताळणी, गुन्ह्यांच्या तपासाची प्रक्रिया तसेच पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तसेच आपत्कालीन हेल्पलाईन ११२ विषयी माहिती देण्यात आली. संकटात सापडलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांसाठी १०९८ या हेल्पलाईनचा वापर कसा करावा तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क कसा साधावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
खोटे फोन करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याचीही विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलातील शस्त्रसामग्रीची प्रत्यक्ष माहिती दिली.
पिस्तूल, १२ बोर छरा बंदूक, एस.एल.आर., कार्बाईन, स्टेनगन, फायबर काठी, ढाल, हेल्मेट, हातकडी आणि अश्रुधूर कांड्या यांची माहिती देत त्यांचा वापर कोणत्या परिस्थितीत केला जातो, हे समजावून सांगितले.
तसेच बंदुकीतील गोळीची रचना, हॅमरचा आघात झाल्यानंतर गोळीला ऊर्जा कशी मिळते आणि गोळी कशा प्रकारे फायर होते, याचे प्रात्यक्षिकासह स्पष्टीकरण दिले.
विद्यार्थ्यांनी विविध शस्त्रसामग्री जवळून पाहून त्याबाबत अनेक प्रश्न विचारले व त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्यात पोलीस अधिकारी किंवा सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे.
चित्रपटांमध्ये दिसणारी अनेक दृश्ये काल्पनिक असतात. त्यामुळे मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलमधील गेम्स, डुप्लिकेट किंवा अनोळखी ॲप्सचा वापर टाळा. तुमचे सध्याचे वय हे अभ्यासाचे व स्वतःचे भविष्य घडविण्याचे आहे.
सोशल मीडियाचा वापरही जबाबदारीने करा. शिक्षणाच्या बळावर तुम्हीही पोलीस अधिकारी किंवा सैन्य दलात अधिकारी बनून देशसेवा करू शकता.”
या प्रसंगी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, ठाणे अंमलदार पोहेकॉ. अजित उबाळे, महिला पोहेकॉ. उज्वला नाईक-निंबाळकर, महिला पोहेकॉ. दुर्गा चौगुले, पोना. सागर सुरवसे, पोकॉ. गणेश दळवी, गोपनीय कक्षाचे पोकॉ. कादर तांबोळी, पोकॉ बाळकृष्ण मुठाळ, सतिश उघडे, तसेच महिला पोकॉ. नम्रता गटकुळ, माधुरी फपाळ, उपस्थित होते.
त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलीस दलातील विविध जबाबदाऱ्या, नागरिकांशी असलेले संबंध आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची भूमिका याविषयी माहिती दिली.
अभ्यासदौऱ्याच्या शेवटी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्याचे विविध विभाग, आधुनिक यंत्रणा, शस्त्रसामग्री आणि पोलीस दलाचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी आनंदित झाले.
हा अभ्यासदौरा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. शाळेच्या शिक्षकांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास आणि पोलीस दलाविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.
