आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

टीडीएस नियमांतील नव्या बदलांवर व्यापाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 15, 2026
Spread the love

पुणे : आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत टीडीएस (Tax Deducted at Source) नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’तर्फे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मार्केट यार्ड येथील चेंबरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नव्या नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आयकर विभागाच्या ‘प्रारंभ २०२६’ या जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रधान मुख्य आयकर आयुक्त-१ तसेच आयुक्त (टीडीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून टीडीएस नियमांतील महत्त्वाच्या बदलांची माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त आयकर आयुक्त पियुष कुमार सिंह यादव यांनी सांगितले की, “नव्या सुधारणांमुळे देशातील करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक आणि करदाताकेंद्रित झाली आहे.

नवीन आयकर रिटर्न फॉर्म आणि सुधारित नियमांमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली असून, करदात्यांनी स्वेच्छेने व वेळेत कर भरावा, हा विभागाचा प्रमुख उद्देश आहे.”

यानंतर उप आयकर आयुक्त अभिनव राठी आणि आयकर अधिकारी कृष्णकांत मिश्रा यांनी नवीन आयकर रिटर्न फॉर्म, टीडीएसचे सुधारित नियम, कर भरण्याची प्रक्रिया तसेच करदात्यांनी घ्यावयाची आवश्यक काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

उपस्थित व्यापारी, चार्टर्ड अकाउंटंट आणि कर सल्लागारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच भविष्यातही आयकर विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, आयकर व्यावसायिक, विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, दि पूना मर्चंट्स चेंबरचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, कार्यकारी मंडळाचे सदस्य तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले, तर सहसचिव आशिष नहार यांनी उपस्थितांचे आभार मानले.