आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

स्व. राकेश जैन यांच्या स्मृतिदिनी ४७ वे रक्तदान शिबिर उत्साहात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 15, 2026
Spread the love

पुणे : स्व. राकेश देवीचंद जैन यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि श्री जिन कुशल सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४७ व्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा संदेश दिला.

१५ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भगवान महावीर यांचे स्मरण करून पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष देवीचंद जैन यांच्या हस्ते विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रक्तदानापूर्वी करण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य तपासणीमुळे रक्तदात्यांना स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळते आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते.

नियमित रक्तदानामुळे समाजहितासोबतच निरोगी जीवनशैलीलाही चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले. विश्वस्त राजेश शाह यांनी सांगितले की, रक्ताची वाढती मागणी आणि तुटवडा असतानाही राकेश जैन मेमोरियल ब्लड सेंटरने गरजू रुग्णांना रक्त व रक्तघटकांचा अखंड पुरवठा केला आहे.

पूना हॉस्पिटलसह परिसरातील अनेक लहान-मोठ्या रुग्णालयांना वेळेवर रक्त आणि आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देत रक्तकेंद्राने महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

स्व. राकेश जैन यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या रक्तकेंद्रामुळे आजवर हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. विशेषतः डेंग्यूसारख्या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक प्लेटलेट्स, रक्त आणि इतर रक्तघटक वेळेत उपलब्ध करून देत रुग्णांना तातडीचे उपचार मिळवून देण्यात या रक्तकेंद्राने मोलाची भूमिका बजावली आहे.

या रक्तदान शिबिरात एकूण १०१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. त्यांच्या या योगदानातून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव अधोरेखित झाला.

या प्रसंगी पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त राजेश शाह, भबुतमल जैन, पूना हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्रनाथ, मेडिकल डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) डॉ. गिरीश देशमुख, तसेच श्री जिन कुशल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश जैन आणि कार्यकारी परिवार उपस्थित होता.