आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सन फार्माच्या नावाने बनावट औषधांची विक्री

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 15, 2026
Spread the love

पुणे : सन फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड, सिक्कीम या कंपनीच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यांची विक्री केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उघडकीस आणले आहे. याप्रकरणी मेडिकल दुकानदार आणि वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत औषध निरीक्षक श्रुतिका कमलसिंग जाधव (वय ४७, रा. मोशी) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सात्विक मेडिकल शॉपचे मालक ललित केसवाणी, महेश वाघमारे, भागीदार कोहिनूर इंद्राणी, शालीमार इंद्राणी, विश्वनाथ इंद्राणी, राजेंद्र घेलाट, शान पटेल, विष्णू पटेल, राकेश शाह, श्यामून सय्यद, सय्यद सोलेह आणि विवेक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील राजयोग बिल्डिंगमधील सात्विक फार्मा शॉप आणि इतर ठिकाणी २८ मार्च २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीममधील सन फार्मा लॅबोरेटरीज या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीकडून ‘लेबीपील’ या गोळ्यांची निर्मिती केली जाते.

या औषधांना कंपनीकडून कोड क्रमांक दिलेला असतो. बाजारात बनावट औषधे येऊ नयेत, यासाठी कंपनीकडून खुल्या बाजारात सातत्याने तपासणी केली जाते.

या तपासणीदरम्यान ‘लेबीपील ५००’ या गोळ्यांच्या अधिकृत बॅच क्रमांकापेक्षा वेगळे कोड आणि बॅच क्रमांक असलेली औषधे मेडिकल दुकानांमध्ये मिळत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले.

त्यानंतर कंपनीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून एफडीएने सात्विक फार्मावर छापा टाकून काही औषधे जप्त केली.

तपासणीत ही औषधे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मेडिकल दुकानदार आणि त्यांना ही औषधे पुरविणाऱ्या वितरकांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार पाटील तपास करत आहेत.