करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसदेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ : नेतृत्व व कौशल्य विकासाचा संदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत १५ जुलै २०२६ रोजी ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते. तसेच करिअर कट्टा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या साक्षी वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते करिअर संसदेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून नेतृत्वगुण, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांनी करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील संधी, योग्य मार्गदर्शन आणि नेतृत्व विकसित करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर करिअर संसदेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय शपथविधी सोहळा संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे, नितीन पडवळ, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. शीतल अलगुंडे, डॉ. मंगेश खराटे, प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे, प्रा. अमोल कुटे, प्रा. राहुल राठोड, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच करिअर कट्टा उपक्रमाशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल अलगुंडे यांनी केले, तर प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे यांनी आभार मानले.
