पीएसआय लाच घेताना रंगेहात जाळ्यात
८ लाखांची मागणी, ३ लाखांची लाच स्वीकारताना अटक : दिघी पोलीस ठाण्यातील कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दाखल गुन्हा ‘बी फायनल’ करण्यासाठी तसेच भविष्यातही मदत करण्याच्या मोबदल्यात ८ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दिघी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडले.
चैताली बाळासाहेब गपाट (वय ३५, रा. ग्रँड बे सोसायटी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत ४२ वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्याच्या तपास अधिकारी म्हणून चैताली गपाट कार्यरत होत्या. त्यांनी हा गुन्हा ‘बी फायनल’ करण्यासाठी तसेच भविष्यातही मदत करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे ८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ जुलै रोजी मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये चैताली गपाट यांनी तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाने दिघी पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.
बी फायनल म्हणजे काय?
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास केला जातो. तपासादरम्यान गुन्हा खोटा असल्याचे आढळल्यास किंवा आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध न झाल्यास पोलीस न्यायालयात संबंधित गुन्हा ‘बी फायनल’ करण्याचा अहवाल सादर करतात. न्यायालयाने हा अहवाल मान्य केल्यानंतर संबंधित गुन्हा बंद करण्यात येतो.
