जुन्या भांडणातून १६ वर्षीय मुलाच्या खुनाचा प्रयत्न
आंबेगावातील तुकारामनगरमधील घटना : तीन शाळकरी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडणातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव येथील तुकारामनगरमध्ये बुधवारी घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात वेदांत धानाप्पा कार्ले (वय १६, रा. वेदांत रेसिडेन्सी, संत तुकारामनगर, आंबेगाव) आणि निखिल काटे (वय १६) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत वेदांतने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. बुधवारी, १५ जुलै रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास वेदांत कार्ले, निखिल काटे आणि त्यांचे मित्र संत तुकारामनगर परिसरातील मोकळ्या जागेत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपी तेथे आले.
त्यांनी वेदांत आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वेदांत आणि निखिल यांना मारहाण करून त्यांच्यावर शस्त्राने वार केले.
त्यानंतर आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या वेदांत आणि निखिल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.
अल्पवयीन आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
