आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 16, 2026
Spread the love

पुणे : कोरेगाव पार्कमधील ‘द वाईब’ प्रोजेक्टमध्ये ११ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर मूळ मुद्दल परत देण्याऐवजी तेथील तीन दुकाने देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि जीएसटीसाठी आणखी १ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपये घेऊन कोणतेही बांधकाम केले नाही. तसेच दुकानेही न देता १२ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गगन लाईफ स्पेस एलएलपीचे सुशील अगरवाल आणि विशाल अगरवाल यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सज्जाद हुसेन गुलामहुसेन गबरानी (वय ८०, रा. बोट क्लब रोड, कल्पतरू गार्डन सोसायटी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक सुशील घनशाम अगरवाल (रा. ज्योती आश्रमजवळ, बिबवेवाडी-कोंढवा रोड, लुल्लानगर) आणि विशाल घनशाम अगरवाल (रा. सॅलेसबरी पार्क) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार कोरेगाव पार्क येथील बोट क्लब रोडवरील सुलक्स कार शोरूम येथे २०१७ पासून आतापर्यंत घडला आहे. वृद्ध कुटुंबाची फसवणूक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्याद नोंदवून घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी यापूर्वी अनेकांची फसवणूक केली असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. सुशील अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादींना ‘द वाईब’ प्रोजेक्टसाठी बँकेने ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असल्याचे खोटे सांगितले.

तसेच त्यांना या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने गगन लाईफ स्पेस एलएलपीच्या खात्यावर ११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर ठरल्याप्रमाणे त्यांनी परतावा दिला.

त्यानंतर फिर्यादींनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मागितली. त्या वेळी अगरवाल यांनी एकत्रितपणे पैसे देता येणार नसल्याचे सांगितले. त्याबदल्यात ‘द वाईब’ प्रोजेक्टमधील दुकान क्रमांक १४, १५ आणि ३४ देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लागणाऱ्या रजिस्ट्रेशन आणि जीएसटीपोटी १ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर आजपर्यंत कोणतेही बांधकाम केले नाही.

फिर्यादींना कोणत्याही दुकानाचा ताबाही दिला नाही. अशा प्रकारे त्यांची एकूण १२ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करीत आहेत.