आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 16, 2026
Spread the love

पुणे : आर्थिक वादातून एका बांधकाम ठेकेदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी या ठेकेदाराने स्वतःचा व्हिडिओ शूट करून सुसाईड नोट लिहिल्याचे आढळून आले आहे.

खलील रज्जूलाल शेख (वय ६५, रा. डायस प्लॉट) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खलील शेख यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये विविध कारणांमुळे आपण कर्जबाजारी झालो असून, त्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच या आर्थिक संकटाला काही व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

खलील शेख यांनी उत्कर्षा असोसिएट्स कंपनीचे पार्टनर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नी, सुनील आहेर यांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा आणि रघू गावडे यांची नावे व्हिडिओमध्ये घेतली आहेत.

रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नी व इतर जण उत्कर्षा असोसिएट्स या कंपनीत भागीदार होते. या कंपनीने पुण्यातील लक्ष्मी रोडवरील एका जागेच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला होता.

दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर हे आमदार झाले. त्यानंतर या प्रकल्पासंदर्भात वक्फ बोर्डाशी संबंधित जागेचा वाद निर्माण झाला होता.

संबंधित जागेवरील बांधकामाला स्थगिती मिळाल्याने प्रकल्प रखडला. त्यामुळे कंपनीने घेतलेल्या पाच कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा वाढला आणि कंपनीचे आर्थिक व्यवहार अडचणीत आले.

आपल्या कंपनीकडून ५० लाख रुपये येणे होते. त्यावरील कर्जाचा हप्ता आपण गेली तीन वर्षे भरत असल्याने आर्थिक अडचणीत आलो असल्याचे खलील शेख यांचे म्हणणे आहे. उत्कर्षा असोसिएट्स, विजय बिल्टकॉन आणि अक्षय कन्स्ट्रक्शन या तिघांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत.

खलील शेख यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दुर्दैवी घटना : रवींद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर या प्रकल्पात अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली. ही जागा आम्ही पाच जणांनी मिळून खरेदी केली होती. महापालिकेने प्लॅन मंजूर केला होता. महारेराने प्रकल्पाला मंजुरी दिली होती. बँकेने पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. दोन मजल्यांचे स्लॅब पडल्यानंतर संबंधित जागा वक्फ बोर्डाची असल्याची नोटीस मिळाल्याने काम रखडले.
हायकोर्टात जाऊन आम्ही त्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव नसल्याचा निकाल मिळविला. मात्र, या प्रकल्पावर माझे नाव असल्याने त्यात अडथळे आणले जात होते. त्यामुळे अखेर २०२५ मध्ये माझी पत्नी प्रतिभा धंगेकर हिचे नाव प्रकल्पातून काढून घेण्यात आले. आपली आणि खलील शेख यांची कधीही भेट झाली नव्हती. आपण संबंधित साईटवरही कधी जात नव्हतो. खलील शेख यांना आमच्याबरोबरच आणखी काही बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे येणे होते. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.