परिमंडळ ७ मध्ये ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहीम
अवैध धंदे, गुन्हेगारी, समाजकंटकाविरुद्ध होणार धडक कारवाई : दोन विशेष पथकांची स्थापना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : परिमंडळ ७ मध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी व समाजविघातक कृत्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके गुप्त माहितीच्या आधारे नियमित धाडी टाकून विशेष मोहिमा राबविणार आहेत. या मोहिमेअंतर्गत १५ जुलै रोजी लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग विशेष कारवाया करण्यात आल्या.
लोहगाव येथील मोजे आळीतील हॉटेल ब्ल्यू डायमंड येथे दुपारी सव्वाबारा वाजता केलेल्या कारवाईमध्ये चालक हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२) याच्याकडून ७ हजार ९९० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा तसेच २ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हॉटेलचा मूळ मालक सूरज गायकवाड याच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल राजरत्न येथे दुपारी १ वाजता करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चालक संकेत भारत घोडके (वय २८) याच्याकडून ४ हजार ५ रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा तसेच ११ हजार ५३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हॉटेलचा मूळ मालक सुहास प्रवीण मोडक याच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशस्वी हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या धाडीत भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे याच्यासह तिघे मटका रायटर रंगेहाथ आढळून आले.
त्यांच्याकडून १० हजार ८९० रुपये रोख रक्कम, कल्याण व मुंबई टाइम बाजारचे मटका साहित्य, वापरलेली ८ पावती पुस्तके, न वापरलेली ११ पावती पुस्तके तसेच २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
या संपूर्ण कारवाईमध्ये दारूबंदीचे २ गुन्हे तसेच जुगाराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ कराड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार बेंद्रे, साबळे, इथापे तसेच पोलीस अंमलदार पुंडे, चिनके व सरतापे यांनी केली.
नागरिकांना आवाहन – परिमंडळ ७ मधील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अवैध दारूविक्री, मटका, जुगार, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे, गुंडगिरी, खंडणी किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर धंद्याची माहिती असल्यास ती पोलीस प्रशासनाला त्वरित कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
मिशन क्रॅकडाऊन माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक – पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार : ८८०२००७९३८, ९९२२७१७९९९, ९९२२७४४५९९
गुन्हेगारांना कायद्याची भीती आणि नागरिकांना सुरक्षिततेची खात्री, या उद्देशाने ‘मिशन क्रॅकडाऊन’अंतर्गत परिमंडळ ७ मध्ये अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. – अबिनाश कुमार, पोलीस उपायुक्त
