रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल
बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या : डायस प्लॉट येथील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम ठेकेदार खलील शेख यांनी आर्थिक कारणांवरून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार आणि माजी नगरसेवकांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सुलताना खलील शेख (वय ५०, रा. आशियाना रोशन बिल्डिंग, डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी विशाल केदारी, सुनील अय्यर व त्यांचा मुलगा, रघू गौडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीदभाई शेख व त्यांचा मुलगा, बाळासाहेब शेडगे व त्यांची पत्नी, रवींद्र धंगेकर व त्यांची पत्नी, शाम कोळपकर आणि शुभम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खलील रज्जूलाल शेख (वय ६५, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी राहत्या घरी गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खलील शेख हे सेंट्रिंगच्या कामाचे ठेके घेत होते. उत्कर्षा असोसिएट्सकडून त्यांना ५० लाख रुपये येणे होते.
माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांनी त्यांना धमकावून त्यांचे सेंट्रिंगचे साहित्य जबरदस्तीने ठेवून घेतले होते. कसबा पेठेतील झांबरे चावडी येथील इमारतीमधील चार फ्लॅटच्या विक्री व भाड्याच्या हिशोबामध्ये भागीदार विशाल केदारी, हमीद शेख व त्यांच्या मुलाने १ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप खलील शेख यांनी केला आहे.
विजय बिल्कॉनशी संबंधित व्यवहारात राजन सेठिया यांनी ४० लाख रुपयांची फसवणूक केली. शाम कोळपकर यांच्याकडून ६ लाख रुपये येणे बाकी आहे.
या कारणांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.
या सर्वांनी दिलेल्या त्रासामुळे खलील शेख यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सिसोदे तपास करीत आहेत.
