आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गँगस्टर नीलेश घायवळचा गुंड प्रशांत धुमाळ याला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 17, 2026
Spread the love

पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याच्या कारणावरून मोबाईल शॉपी मालकावर खुनी हल्ला करणाऱ्या घायवळ टोळीतील गुंड प्रशांत धुमाळ (रा. दत्तवाडी) याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.

प्रशांत धुमाळ हा नीलेश घायवळ याच्या टोळीतील गुंड असून, यापूर्वीही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या घटनेत अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांचे कर्वे रोडवर ‘स्मार्ट कॅफे मोबाईल शॉपी’ हे दुकान आहे. या मोबाईल शॉपीमधून बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करण्यात आला होता.

त्यानंतर अमित शिंदे यांनी गेल्या वर्षी कोथरूड पोलिसांकडे नीलेश घायवळ याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यामुळे नीलेश घायवळची टोळी त्यांच्यावर राग धरून होती.

तसेच त्यांचे आणि पत्नीचे पटत नसल्याने ते वेगळे राहतात. त्यांचा मेव्हणा ऋषिकेश शिरगावकर याने फेब्रुवारी २०२६ मध्ये, ‘‘पुढच्या सहा महिन्यांत तुझा कार्यक्रम करतो,’’ अशी धमकी दिली होती.

अमित शिंदे हे १४ जुलै रोजी सायंकाळी ‘स्मार्ट कॅफे मोबाईल शॉपी’ या दुकानात असताना महापालिकेत काम करणारा अभिषेक खोमणे तेथे आला.

बिल्डिंगमधील पाणी तुंबत असलेली जागा दाखविण्यासाठी तो त्यांना मागील बाजूला घेऊन गेला. त्याच वेळी प्रशांत धुमाळ त्यांच्याजवळ आला.

त्याने, ‘‘तुला माज आला आहे का?’’ असे म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या कानाखाली मारली. त्या वेळी अमित शिंदे यांनी प्रशांत धुमाळ याला, ‘‘एवढी मुले तुझ्यासोबत का आली आहेत?’’ असे विचारले. तेव्हा त्याने एका मुलाला उद्देशून, ‘‘लाव रे भैयाला व्हिडिओ कॉल,’’ असे म्हटले.

त्यानंतर प्रशांत व इतरांनी आपल्याकडील कोयते काढून अमित यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने कोयत्याने अमित यांच्या डोक्यावर वार केला.

तसेच त्यांच्या हातावरही वार करण्यात आले. प्रशांत व त्याचे साथीदार आपल्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने आल्याचे लक्षात आल्यानंतर अमित यांनी पार्किंगचे गेट ढकलून बाहेर पळ काढला आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आश्रय घेतला.

पत्नी ऋतुजा आणि मेव्हणा ऋषिकेश शिरगावकर यांच्या सांगण्यावरून प्रशांत धुमाळ व त्याच्या साथीदारांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अमित शिंदे यांनी दिली होती.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके स्थापन केली होती. प्रशांत धुमाळ याला आज पहाटे मुंबईतून अटक करण्यात आली.