विजेच्या धक्क्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू
मंडप उतरवताना ताडीवाला रोडवरील घटना : मंडप व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मंडप व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मंडप उतरवताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोड भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी मंडप व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यश प्रितियानी (वय १६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत यशचे मामा धनंजय कृष्णा मापुसकर (वय ४९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मंडप व्यावसायिक आसीफ कासम सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोडवरील मारुती मंदिराजवळ एका विवाह समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यश प्रितियानी हा मंडप व्यावसायिकाकडे काम करत होता. तो अल्पवयीन असतानाही त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करून घेतले जात होते.
हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ३ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास मंडप उतरवत असताना यशला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
यश अल्पवयीन असतानाही त्याच्याकडून काम करून घेतले जात होते. मंडप व्यावसायिकाने सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नव्हती.
त्याच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. बंडगार्डन पोलिसांनी किशोर कामगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौगुले तपास करत आहेत.
