आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महापालिका उपायुक्तांच्या तोतया पुतण्याला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 17, 2026
Spread the love

पुणे : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून कर कमी करून देण्याच्या नावाखाली नागरिकाची फसवणूक करणाऱ्या तोतयाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

विजेंद्र हनुमंत पवार (वय ३५, रा. मॉडेल कॉलनी) असे या तोतयाचे नाव आहे.

याबाबत संतोष गंगाराम नाईक (वय ४४, रा. तनीष पार्क, चऱ्होली) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पुणे महापालिकेत २० मार्च २०२६ रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची व्यावसायिक मालमत्ता असून, तिच्यावर जादा मालमत्ता कर आकारण्यात आल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे ते चौकशीसाठी महापालिकेत आले होते. त्या वेळी विजेंद्र पवार याने, ‘‘मी कर आकारणी व कर संकलन उपायुक्त पवार साहेबांचा पुतण्या आहे,’’ असे सांगितले. तसेच, ‘‘तुमचा कर कमी करून देतो,’’ असे आश्वासन त्याने दिले. कर संकलन उपायुक्तपदी रवी पवार हे अधिकारी असल्यामुळे फिर्यादींना त्याचे म्हणणे खरे वाटले.

‘‘एकदा कर कमी झाला की तो कायमचा कमी होईल,’’ असे सांगून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्याने कर कमी करून दिला नाही. त्याने दिलेला मोबाईल क्रमांकही बंद लागत होता.

फिर्यादी १६ जुलै २०२६ रोजी कामानिमित्त महापालिकेत आले होते. त्या वेळी विजेंद्र पवारही महापालिकेत आला होता. त्याला पाहताच फिर्यादींनी पकडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून सुरक्षा रक्षक धावत आले. त्यांनी विजेंद्र पवार याला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले.

विजेंद्र पवार हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास काठे तपास करीत आहेत.