दारू निर्मितीसाठी लागणारे ३ हजार ४२० किलो ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कारवाई : ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकलसह चौघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बनावट दारूच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेट आणि ते तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकल असा मोठा साठा अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने जप्त केला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील एमआयडीसीमधील समर्थ लॅबोरेटरीजमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५५), नवी सर्वर जमीर सिद्दीकी (वय ४०) आणि आदेश विठ्ठल पाचांगणे (वय ५८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुणे जिल्ह्यातील समर्थ लॅबोरेटरीजमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सुमारे दीड महिना बारकाईने लक्ष ठेवून २९ जून रोजी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार ४२० किलो वजनाचा पिवळ्या रंगाचा स्फटिकासारखा संशयित पदार्थ तसेच तो तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले.
समर्थ लॅबोरेटरीज ही संशयित आरोपी किशोर सुर्वे याच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच किशोर सुर्वे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले आहे. या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेल्या सेंट्रीफ्युगल मशीन आणि जीएलआर मशीनची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक आणि अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.
१५ लाख लिटर बनावट दारू निर्मितीचा डाव
जप्त करण्यात आलेले ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेट हे एमडी किंवा मेफेड्रॉनच्या निर्मितीसाठी वापरले जाते का, याची तपासणी करण्यात आली. मात्र, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हा पदार्थ प्रतिबंधित क्लोरल हायड्रेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रसायनापासून बनावट दारू तयार केली जाते. जप्त केलेल्या क्लोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर बनावट दारू तयार करता आली असती, असा प्राथमिक अंदाज आहे.
