इथून निघून जा, नाहीतर इथेच ठोकीन
डॉक्टरांनी चक्क छातीवर पिस्तूल रोखून दिली धमकी : विलू पूनावाला हॉस्पिटलमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : निधन झालेल्या महिलेच्या उपचारांचे २ लाख ४० हजार रुपयांचे बिल भरलेले असतानाही आणखी २ लाख २३ हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगण्यात आले. बिलामध्ये सवलत मागितल्यानंतर विलू पूनावाला हॉस्पिटलमधील मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉक्टरांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या छातीवर पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘तूही कांबळे आहेस आणि आमदार कांबळेही माझ्या अत्यंत जवळचे आहेत. इथून निघून जा, नाहीतर इथेच ठोकीन,’ असे म्हणत डॉक्टरांनी धमकावल्याचा आरोप आहे.
याबाबत प्रतीक उत्तम कांबळे (वय ३३, रा. जान मोहम्मद स्ट्रीट, कॅम्प) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विलू पूनावाला हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर्या लजपतराय (वय ५८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विलू पूनावाला हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील केबिनमध्ये १६ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र फुरसुंगी येथील राजू विष्णू खुडे यांच्या आई सुशीला खुडे (वय ६०) यांचे विलू पूनावाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना १६ जुलै रोजी दुपारी निधन झाले. त्यांनी आतापर्यंत उपचारांसाठी २ लाख ४० हजार रुपयांचे बिल भरले होते. तरीसुद्धा विलू पूनावाला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनातील अधिकारी आर्या लजपतराय आणखी २ लाख २३ हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगत असल्याचे त्यांना समजले.
त्यावरून प्रतीक कांबळे आणि त्यांचा चुलत भाऊ ऋषिकेश कांबळे रात्री साडेसात वाजता विलू पूनावाला हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील बाऊन्सर केतन वायकर यांनी त्यांना हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर्या लजपतराय यांच्या पहिल्या मजल्यावरील केबिनमध्ये नेले. कांबळे यांनी, ‘आता बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे बिलामध्ये सवलत द्यावी,’ अशी विनंती केली. त्यावर, ‘मी मोठमोठ्या लोकांचे बिल कमी करत नाही, मग तुझे कसे करणार?’ असे सांगून त्यांनी बिल कमी करण्यास नकार दिला.
आर्या लजपतराय यांनी अरेरावी करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ‘तूही कांबळे आहेस आणि आमदार कांबळेही माझ्या अत्यंत जवळचे आहेत.’ कांबळे यांनी पुन्हा बिल कमी करण्याची विनंती केल्यानंतर ते आणखी संतापले. त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधून पिस्तूल काढून हातात धरले आणि कांबळे यांच्याशी बोलू लागले.
तेव्हा कांबळे यांनी आर्या लजपतराय यांना, ‘पिस्तुलाची धमकी का देत आहात?’ असे विचारले. त्यानंतर त्यांनी आणखी संतापून हातातील पिस्तूल कांबळे यांच्या छातीवर रोखले आणि म्हणाले, ‘तुझे एक रुपयासुद्धा बिल कमी करणार नाही. तू आत्ताच्या आत्ता येथून निघून जा, नाहीतर इथेच ठोकीन.’
त्यानंतर बाऊन्सर केतन वायकर यांनी लजपतराय यांना त्यांचे पिस्तूल आणि गोळ्यांच्या पाऊचसह केबिनमधून बाहेर नेले. त्यानंतर कांबळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
