आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘नीट’च्या निकालानंतर विद्यार्थिनीची आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 18, 2026
Spread the love

पुणे : ‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर भागातील महंमदवाडी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. गेल्या दोन दिवसांत आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यामध्ये दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुण जखमी झाला आहे.

अनुष्का चौगुले (वय १८, रा. सॅफ्रॉन हिल सोसायटी, महंमदवाडी, हडपसर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनुष्काने ‘नीट’ची परीक्षा दिली होती. गुरुवारी सायंकाळी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तिचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. तिला एक लहान भाऊ आहे. शुक्रवारी सकाळी तिचे वडील कामावर गेले आणि भाऊ शाळेत गेला. तिची आई घरातील कामे करीत होती.

सकाळी अनुष्काने खोलीचा दरवाजा उघडला नाही. आईने तिला हाक मारली; मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. दरवाजा आतून बंद होता. तिच्या आईने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा अनुष्काने गळफास घेतल्याचे दिसून आले.

गुरुवारी सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळाचे कामकाज संथगतीने सुरू होते. अनुष्काने निकाल पाहिल्यानंतर आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अनुष्काने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहिली नव्हती. अनुष्का मोबाइलही वापरत नव्हती. तिच्या आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकले नाही.

राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

रिद्धी रवी केडिया (वय १७, रा. निर्मल पार्क सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

रिद्धी बारावीमध्ये शिक्षण घेत होती. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर सर्व जण झोपी गेले. रिद्धी तिच्या आजीजवळ झोपायची. मध्यरात्री आजीला जाग आल्यानंतर शेजारी रिद्धी दिसली नाही.

त्यांनी घरामध्ये तिचा शोध घेतला. बाल्कनीमध्ये स्टूल दिसले. त्यांनी इमारतीखाली जाऊन पाहिले असता रिद्धी खाली पडलेली दिसली. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सहकारनगर पोलिसांनी तिचा मोबाइल, वह्या आणि पुस्तके ताब्यात घेतली आहेत.

यातील आणखी एक घटना शुक्रवारी सकाळी साई दत्तनगर येथे घडली. एका १७ वर्षीय तरुणाने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यानेही ‘नीट’ परीक्षा दिली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, तो घसरुन पडला. पोलीस तपास करीत आहेत.