आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्यावसायिकाची सॅक चोरणारे आरोपी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 20, 2026
Spread the love

पुणे : मार्केटयार्डमधून घरी आलेल्या व्यावसायिकाच्या सुरक्षारक्षकाच्या हातातील ६ लाख ५० हजार रुपये असलेली सॅक चोरून नेल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी १५० ते १६० सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींना निष्पन्न केले. ३० वर्षे नोकरी केलेल्या एका ज्येष्ठ नोकराने आपल्या जावयाला माहिती देऊन ही चोरी घडवून आणल्याचे समोर आले आहे.

सोहेल अलीअहमद खान (वय ३५, रा. मार्केटयार्ड), तौसिफ मुकीद बागवान (वय ३०, रा. भीमपुरा, कॅम्प) आणि जयंत रजनीकांत शहा (वय ५९, रा. गंगाधाम चौक, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जयंत शहा हे विकेश शहा यांच्याकडे जवळपास ३० वर्षे कामाला होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. सोहेल खान हा त्यांचा जावई आहे.

विकेश शहा हे ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता मार्केटयार्डमधून घरी आले. कार पार्क केल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडील सॅक घेतली.

शहा गेटमधून आत गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ सुरक्षारक्षक चंद्रासिंग पहल हे सॅक घेऊन येत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातून ६ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली सॅक हिसकावली आणि दुचाकीस्वाराच्या मागे बसून पलायन केले.

सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसाट आणि तपास पथकातील अंमलदारांनी घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १५० ते १६० सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींची नावे निष्पन्न केली.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता, एक संशयित मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्याचा पाठलाग केला असता, तो पुन्हा पुण्याच्या दिशेने येत असल्याचे आढळले.

त्यानंतर त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने इतर दोघांच्या संगनमताने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. जयंत शहा आणि सोहेल खान या सासरा-जावयावर आर्थिक देणी झाली होती.

ती मिटविण्यासाठी त्यांनी संगनमत करून जयंत शहा पूर्वी नोकरीला असलेल्या विकेश शहा यांना लुबाडण्याचा कट रचला. विकेश शहा यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा जयंत शहा यांना माहिती होत्या.

त्यानुसार सोहेल खान याने तौसिफ बागवान या मित्राला सोबत घेतले. तौसिफ बागवान दुचाकी चालवत होता, तर त्याच्या मागे सोहेल खान बसला होता.

सोहेल खान याने सॅक हिसकावली आणि बागवानच्या दुचाकीवर बसून दोघांनी पलायन केले. पोलिसांनी चोरलेले ६ लाख ५० हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली ७० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसाट, सहायक पोलीस फौजदार अश्रुबा मोराळे, पोलीस हवालदार हर्षल शिंदे, नाना भांदुर्गे, सागर केकाण, प्रशांत टोणपे तसेच पोलीस अंमलदार सुजय पवार, सागर काळे, संग्राम केंद्रे, रमेश चव्हाण आणि अनिता धायतडक यांनी केली.