गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील गुंड जेरबंद
दोन मोक्का गुन्ह्यांत होता वाँटेड : घरी आला अन् जाळ्यात सापडला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील गुंड आणि दोन मोक्का गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाने जेरबंद केले आहे. दहा महिने फरार राहिल्यानंतर तो घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला पकडले.
पंकज सुरेश वांभिरे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नीलेश घायवळ याच्या सांगण्यावरून त्याच्या गुंडांनी सप्टेंबर २०२५ मध्ये गोळीबार केला होता.
तसेच, एकावर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली होती. या दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यात पंकज वांभिरे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
तेव्हापासून पंकज वांभिरे फरार होता. पोलीस त्याचा सातत्याने मागोवा घेत होते. गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकातील पोलीस अंमलदार अतुल साठे आणि संदीप शेळके यांना पंकज वांभिरे हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुजरात कॉलनीतील त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला सहायक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार अतुल साठे, संदीप शेळके, तारू, तुपसौंदर, बोडरे, गायकवाड, चंदनशिवे तसेच महिला पोलीस अंमलदार वाघमारे आणि जगदाळे यांनी केली.
