बंडगार्डन पोलीस ठाण्यातून पसार आरोपी पुन्हा जेरबंद
मालकाकडे चोरी केल्याने केली होती अटक : बेडी काढून गेला होता पळून
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कँटीनमध्ये पहिल्याच दिवशी दिवसभर काम केल्यानंतर मध्यरात्री मालकाच्या खोलीतून पैसे, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड चोरून तो पळून गेला होता. बंडगार्डन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्याला अटक करून तपास पथकाच्या खोलीत बेडी घालून ठेवले असताना, पहाटे त्याने बेडीतून अलगद हात बाहेर काढला आणि पलायन केले. पोलिसांनी त्याचा पुन्हा शोध घेऊन धायरी येथील नातेवाइकाच्या घरातून अटक केली.
वैभव अनिल खोत (वय १९, रा. श्रमिकनगर, टिंगरेनगर) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत अविनाश उत्तम कांबळे (वय ३२, रा. येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते ताडीवाला रोड आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ या ठिकाणी कँटीन चालवितात.
१५ जुलै रोजी दुपारी त्यांनी मित्राच्या सांगण्यावरून वैभव खोत याला कामगार म्हणून कामावर ठेवले. त्याने दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील कँटीनमध्ये काम केले.
त्यानंतर तो ताडीवाला रोड येथील दुष्काळ झोपडपट्टीमध्ये झोपण्यासाठी आला होता. कांबळे वरच्या मजल्यावर झोपले होते. १६ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा आचारी श्याम प्रसाद रिमल याने वैभव खोत खोलीत नसून काहीही न सांगता निघून गेल्याचे सांगितले.
कांबळे यांनी खोलीतील सामानाची पाहणी केली असता, ते झोपेत असताना वैभव खोत याने खोलीतून ५५ हजार रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड चोरून नेल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी त्याला १८ जुलै रोजी दुपारी अटक करून तपास पथकाच्या खोलीत बेडी घालून ठेवले होते. तेथे असताना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याने बेडीतून अलगद हात काढला आणि पोलीस ठाण्यातील सर्वांची नजर चुकवून पलायन केले.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस अंमलदार शहाजी श्रीरंग ठवाळ यांनी फिर्याद दिली. पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याने एकच खळबळ उडाली.
बंडगार्डन पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. त्यानंतर रात्री उशिरा तो धायरी येथे एका नातेवाइकाच्या घरी सापडला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.
