आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 21, 2026
Spread the love

पुणे : न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर नेण्यात आलेल्या आरोपीकडे कारागृहात परतताना गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे.

निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय २१, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कारागृह रक्षक समाधान हत्तीकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहालसिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडी, लूटमार यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

काही महिन्यांपूर्वी हडपसर परिसरात निहालसिंगने सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार केला होता. सहायक पोलीस निरीक्षकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

या प्रकरणात तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. १८ जुलै रोजी त्याला न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून नेण्यात आले होते.

न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर तो शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास येरवडा कारागृहात परतला. कारागृहात प्रवेश केल्यानंतर आरोपीची नियमित झडती घेण्यात येते.

मेटल डिटेक्टरमधून जात असताना अलार्म वाजला. त्यानंतर कारागृह रक्षकांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याने फॉइल पेपरमध्ये गुंडाळून आणलेला १२ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ५०० रुपये आहे.

या घटनेची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी कारागृहाला भेट दिली. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी निहालसिंगविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.