कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
३०० हमाल बांधवांची नेत्रतपासणी, २०० जणांना चष्म्यांचे वाटप : १८ जणांनी केले रक्तदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला हमाल बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्रतपासणी, स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, बीएमडी (Bone Mineral Density) तपासणी तसेच रक्तदान अशा विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश शहा म्हणाले, “सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची नियमित काळजी घेणे, वेळेवर वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि आजारांचे लवकर निदान करणे अत्यंत गरजेचे आहे.”
यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, पुना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे हॉस्पिटलचे विश्वस्त अशोक ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद पाटील, जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे खजिनदार हरीश शहा तसेच अमनोरा एस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये हमाल बांधव व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरात एकूण ३०० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली, २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, २५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली, ३० महिलांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली, तर १८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, सिप्ला ब्रीद फ्री, पुणे हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज आणि अमनोरा एस फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. शिबिरास व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
