आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 22, 2026
Spread the love

पुणे : बेकायदा धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ७ अंतर्गत ‘मिशन क्रॅकडाऊन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत वडगाव शेरी व विमाननगर परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत मटका रायटर भीम रमेश तेलंगी (वय ३१, रा. खराडकर पार्क, खराडी), अर्जुन भीमराव शिंदे (वय ५०, रा. वडगाव शेरी), नवनाथ गोरख म्हस्के (वय ५५, रा. ससाणे कॉलनी, केशवनगर, मुंढवा), लक्ष्मण एकनाथ आढामळे (वय ४७, रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी), निलेश राजेश गुंजाळ (वय ३६, रा. वडार वस्ती, येरवडा), राजेंद्र संभाजी मोरे (वय ५४, रा. खराडकर पार्क, खराडी), अतिश सतीश सोनवणे (वय २९, रा. वडगाव शिंदे, लोहगाव) तसेच ग्राहक नवनाथ सुभाष गायकवाड (वय ३१, रा. खराडकर पार्क, खराडी) आणि विठ्ठल छबुराव दुवे (वय ५०, रा. थिटे वस्ती, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत रोख रक्कम, तीन दुचाकी, सहा मोबाईल आणि जुगार साहित्य असा एकूण २ लाख ३१ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील मुख्य चालक विशाल जगदीश तिवारी (रा. खराडकर पार्क, खराडी) तसेच घरमालक सोनू पिल्ले (रा. वडगाव शेरी) यांनाही आरोपी करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तुषार बाबासाहेब मस्के (वय २६) आणि राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय २७) यांच्याकडून १५.८० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच विमाननगर परिसरातील एका मटका अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोकड तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमेअंतर्गत गुन्हेगारी टोळ्या, गावठी दारू, अमली पदार्थ विक्री तसेच मटका अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. त्यासाठी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ कराड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच पोलीस हवालदार बेंद्रे, साबळे, इथापे आणि पोलीस अंमलदार पुंडे, चिनके, सरतापे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे केली.

गुन्हेगारी टोळ्या, गुटखा, गावठी दारू, अमली पदार्थ विक्री तसेच जुगार अड्ड्यांबाबत नागरिकांना कोणतीही माहिती द्यायची असल्यास त्यांनी परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार (मोबाईल : ८८०२००७९३८), विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ कराड (मोबाईल : ९९२२७१७९९९) किंवा पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड (मोबाईल : ९९२२७४४५९९) यांच्याशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी केले आहे.