संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक
विवाहविषयक संकेतस्थळावरून झाली ओळख : आजाराच्या उपचारासाठी मागितले होते पैसे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विवाहाचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीशी ओळख वाढवत लग्नाची बोलणी करून तिची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी सध्या वडगाव शेरीतील सोमनाथनगर परिसरातील एका खासगी वसतिगृहात राहते. ती एका माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे.
तिने ‘जीवनसाथी’ या विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. फेब्रुवारी महिन्यात आरोपीने संकेतस्थळाच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधून विवाहाबाबत विचारणा केली.
त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे नोकरीविषयी विचारणा केली असता, त्याने रशियातील मॉस्को शहरात नोकरी करत असल्याची बतावणी केली.
त्यानंतर आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्याने तिच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधून विवाह करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. ते मोबाईलवरून एकमेकांच्या सतत संपर्कात होते.
काही दिवसांपूर्वी फोनवर बोलत असताना आरोपीने छातीत दुखत असल्याचे सांगून आजाराच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. तसेच, माझा पगार झाला नसल्याचे कारण देत त्याने तरुणीला आपल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.
आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने कोणतीही शहानिशा न करता त्याच्या बँक खात्यात ४ लाख ३५ हजार रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल क्रमांक बंद करून तरुणीशी सर्व संपर्क तोडला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक अमोल धस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
