महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
लिपिकपदाचे दिले होते आश्वासन : लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुलाला पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत एकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश रोहिदास जाधव (रा. पिंपरी-चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात राहतात. त्यांची आरोपीशी २०२२ मध्ये ओळख झाली होती.
आरोपीने आपण ससून रुग्णालयात नोकरीला असल्याचे सांगितले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगून आरोपीने तक्रारदाराच्या मुलाला लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते.
त्यानंतर त्याने तक्रारदाराकडून वेळोवेळी साडेअकरा लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही त्याने तक्रारदाराच्या मुलाला नोकरी लावून दिली नाही.
त्यामुळे तक्रारदाराने आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपीने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपीने त्यांना ५० हजार रुपये परत केले. त्यानंतर पाच लाख रुपयांचा धनादेश दिला.
मात्र, बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो वटला नाही. आरोपीने उर्वरित पैसेही परत न केल्याने तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक कांगणे तपास करत आहेत.
