लॉजवर छापा टाकून ९ तरुणींची सुटका
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाची कारवाई : लॉज मॅनेजर, रिक्षाचालकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नवले पूल परिसरातील लॉजमध्ये तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याच्या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने साई किरण लॉजवर छापा टाकून नऊ तरुणींची सुटका केली. याप्रकरणी लॉज मॅनेजर आणि रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
रिक्षाचालक राकेश राजू पाटोळे (वय २७, रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी) आणि लॉज मॅनेजर मंगेश व्यंकट बनसोडे (रा. गॅलेक्सी लॉज, कात्रज रस्ता, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांना नवले पुलाजवळील साई किरण लॉजमध्ये तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला. रिक्षाचालक या तरुणींना लॉजवर पोहोचविण्याचे काम करत होता. बनावट ग्राहकाने इशारा देताच पोलिसांनी साई किरण लॉजवर अचानक छापा टाकला.
तेथे वेश्यागमनासाठी नऊ तरुणींना आणण्यात आले होते. पोलिसांनी या तरुणींची सुटका करून लॉज मॅनेजर आणि रिक्षाचालकाला अटक केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते आणि पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबन केदार, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, इम्रान खान नदाफ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक आणि वैशाली इंगळे यांनी केली.
