अल्पवयीन मुलाकडून ५ गुन्हे उघडकीस
काळेपडळ पोलिसांची कामगिरी : ३ दुचाकी, १ रिक्षा, १ मोबाईल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून तीन दुचाकी, एक रिक्षा आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार चोरीला गेलेल्या दुचाकींचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत होते. त्या वेळी पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीची दुचाकी घेऊन एक जण उंड्रीतील हिल ग्रीन शाळेसमोरील रस्त्यावर थांबला आहे.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली एक दुचाकी, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी, एक रिक्षा आणि एक मोबाईल असा चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांनी केली.
