आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२१ बांधकाम व्यावसायिक, जागा मालकांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 23, 2026
Spread the love

पुणे : मिळकतीबाबत बनावट पीएमआरडीए विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा पत्र तसेच महापालिकेची बनावट कागदपत्रे जोडून २२ बनावट खरेदीखत दस्तांची नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २१ बांधकाम व्यावसायिक व शेतमालकांविरुद्ध सह दुय्यम निबंधकांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सह दुय्यम निबंधक रवींद्र नामदेव कोळी (वय ४६, रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी आंबेगाव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता.

काही बिल्डरांनी त्यांच्या मिळकतीबाबत बनावट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा पत्र तसेच पुणे महापालिकेचे कमेन्समेंट सर्टिफिकेट जोडून खरेदीखत दस्त नोंदणी करून घेतल्याची तक्रार त्यांनी केली होती.

या तक्रार अर्जासोबत त्यांनी संबंधित दस्तांची यादीही जोडली होती. त्यानुसार पीएमआरडीए व पुणे महापालिकेकडे चौकशी करण्यात आली. दोन्ही विभागांनी आपापले अहवाल सादर केले.

या अहवालांचे अवलोकन केल्यानंतर संबंधित बिल्डरांनी एकूण २२ खरेदीखत दस्तांमध्ये पीएमआरडीएचे विकास परवानगी पत्र, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा पत्र तसेच पुणे महापालिकेचे कमेन्समेंट सर्टिफिकेट जोडून ते खरे असल्याचा भास निर्माण करत सह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत दस्तांची नोंदणी करून घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करीत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फे भागीदार सचिन अशोकराव पाटील (वय ३५), महेश नामदेव कुडले (वय ३५, रा. नर्‍हे), ज्ञानोबा विजयकुमार गुरुडे (वय ३९, रा. खडकवासला), सुधीर अशोक पाटील (वय ३९, रा. नर्‍हे).
शिवाय असोसिएट्सतर्फे भागीदार मंगेश बाळासाहेब बेलदरे (वय ३७, रा. आंबेगाव).
व्यंकटेश डेव्हलपर्सतर्फे भागीदार दत्तात्रय गोपाळ पालकर (वय ५१, रा. नर्‍हे).
श्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स भागीदारी संस्थेतर्फे भागीदार अनिल शंकर हाक्के (वय ४७, रा. वारजे), अशोक शाहुराव घांडगे (वय ४७, रा. धायरी), देवेंद्र शंकर अनमल (वय ६०, रा. नाना पेठ), श्वेता देवेंद्र अनमल (वय ३०, रा. नाना पेठ), ओंकार देवेंद्र अनमल (वय ३०, रा. नाना पेठ), गायत्री निलेश अनमल (वय ३५, रा. नाना पेठ), स्नेहा देवेंद्र अनमल (वय ३१, रा. नाना पेठ).
श्री डेव्हलपर्सतर्फे भागीदार संतोष गणपत वाल्हेकर (वय ३६, रा. धनकवडी), विनोद खंडुजी पोकळे (वय ४०, रा. धायरी), अमिता प्रसाद कदम (वय ४८, रा. धायरी), देविदास राजू चव्हाण (वय ४३, रा. नर्‍हे), विक्रम भानुदास बेनकर (वय ३४, रा. धायरी).
राजलक्ष्मी डेव्हलपर्स अँड बिल्डर्सतर्फे निखिल देवीदास बेलदरे (वय २७, रा. कात्रज), तुषार एकनाथ धुमाळ (वय २७, रा. किरकटवाडी), निखिल राजेंद्र काकडे (वय २५, रा. धनकवडी).

निडर सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी
काही दिवसांपूर्वी दस्त नोंदणीस नकार दिल्यामुळे सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांना काही जणांनी मारहाण केली होती. त्यामुळे ते सध्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयातूनच त्यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

कोळी यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील निबंधक कार्यालयांमध्ये एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे शासनाचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

आंबेगाव पोलिसांनी आरोपी दीपक झुंबर शिंदे (वय २९, रा. गोकुळनगर, कात्रज) आणि धर्मेश जगदीश राठोड (वय ३४, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी योगेश रामदास कापरे आणि तुषार रामदास कापरे यांनी कोळी यांना मारहाण केली होती. या फरार आरोपींना पळून जाण्यास या दोन्ही आरोपींनी मदत केल्याचा आरोप आहे.