आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विक्रीसाठी आणलेल्या दोघांकडून मांडूळ जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 23, 2026
Spread the love

पुणे : दिवे घाटाच्या पायथ्याजवळ दोघेजण मांडूळ साप विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सुमारे १ लाख रुपये किमतीचा मांडूळ जप्त केला.

प्रथमेश सुरेश चव्हाण (वय १९, रा. जगतापनगर, सोनके, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि शिवराज अनिल भोईटे (वय २१, रा. भोईटे वस्ती, वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद अतुल कोरडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक दिवे घाट पायथ्यावरील वडकी नाला परिसरात पोहोचले. तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये मांडूळ आढळून आला.

जप्त करण्यात आलेला मांडूळ तपकिरी रंगाचा असून त्याचे अंदाजे वजन १ किलो आणि लांबी ४५ इंच आहे. बाजारात त्याची अंदाजे किंमत १ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी मांडूळ वन विभागाच्या ताब्यात दिला असून पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव पुढील तपास करीत आहेत.

मांडूळ हा बिनविषारी साप
मांडूळ हा बिनविषारी, शांत आणि लाजाळू स्वभावाचा साप आहे. त्याची हालचाल मंद असते. त्याचे जाडसर शरीर तसेच शेपटी आणि तोंड यांमध्ये साम्य असल्यामुळे त्याला ‘दुतोंड्या’ असेही म्हटले जाते. त्याचा रंग तपकिरी तर पोटाचा रंग फिकट तपकिरी असतो. हा साप मऊ जमिनीत बिळे करून राहतो आणि कोरड्या जागांना पसंती देतो. पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास तो जमिनीवर येतो. उंदीर, घुशी तसेच इतर लहान सस्तन प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे.
समाजात गुप्तधन मिळवण्यासाठी किंवा काळी जादू करण्यासाठी मांडूळाचा वापर केला जातो तसेच त्याच्या विक्रीतून अमाप संपत्ती मिळते, अशा निराधार अफवा पसरल्या असून त्यातून या सापाची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येते.