तरुणाचे अपहरण करून बहिणीच्या घरात केले बंदिस्त
काळेपडळ पोलिसांची तत्काळ कारवाई : एका गुंडाला अटक, चौघे फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भावाने पिस्तूल चोरून गावाला पळून गेल्याच्या संशयावरून काही गुंडांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला बहिणीच्या घरी नेऊन बंदिस्त केले. दरम्यान, भाचीने प्रसंगावधान राखत घरातून बाहेर पडून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबाची सुटका केली. या गोंधळात चौघेजण पळून गेले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयितांनी त्यांची हत्यारे कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
काल्या ऊर्फ लाजरास सुनील नगरकर (वय २५, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सुनील घुले (रा. वानवडी) आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुरज अशोक खमारी (वय ३५, रा. गणेशनगर, मोहम्मदवाडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहम्मदवाडी येथील न्याती इबोनी सोसायटी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज खमारी हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते न्याती इबोनी सोसायटीमध्ये गाड्या धुण्याचे काम करतात. त्यांचा मोठा भाऊ शिवा खमारी (वय ३७) हा सुनील घुले यांच्या भाड्याच्या खोलीत राहत होता आणि मजुरीचे काम करत होता. मात्र, तो गेल्या महिनाभरापासून मूळ गावी गेला आहे. सुरज यांची बहीण सीमा घरामी (वय ४०), तिचे पती दाजी शंकर घरामी आणि मुलगी रिया (वय १७) हे वडाची वाडी येथे राहतात.
२१ जुलै रोजी सकाळी सुरज खमारी नेहमीप्रमाणे गाड्या धुण्यासाठी गेले असता सुनील घुले तेथे आला. “तुझ्याशी बोलायचे आहे,” असे सांगून त्याने आणि त्याच्या साथीदाराने सुरज यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून एका गोदामात नेले. तेथे लाकडी बांबूने मारहाण करून “तुझा भाऊ शिवा कुठे आहे?” अशी विचारणा करण्यात आली. सुरज यांनी शिवा गावी गेल्याचे सांगितले. त्यानंतर शिवाचा संपर्क त्याची बहीण सीमा हिच्याशी असल्याचे समजल्यावर आरोपींनी सुरज यांना वडाची वाडी येथील सीमा हिच्या घरी नेले.
त्यावेळी घरात रिया एकटीच होती. सुनील घुले, काल्या ऊर्फ लाजरास नगरकर आणि त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून रियाला “हमारे हत्यार किधर है?” अशी विचारणा केली. काही वेळाने सीमा घरी आल्यानंतर आरोपींनी तिलाही त्यांच्या पिस्तुलांबाबत विचारणा केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी सीमाने त्यांची हत्यारे कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे सांगितल्याने आरोपी संतप्त झाले. त्यांनी घरातील कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही.
दरम्यान, सुरज यांची पत्नी डोला तेथे आली. सुरज यांना सुरू असलेली मारहाण पाहून तिला धक्का बसून ती बेशुद्ध पडली. याच गोंधळाचा फायदा घेत रिया घराबाहेर पडली आणि तिने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.
काही वेळातच काळेपडळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच आरोपींची धावपळ उडाली. त्यापैकी चौघेजण पसार झाले, तर काल्या ऊर्फ लाजरास नगरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे पुढील तपास करीत आहेत.
