आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नशेसाठी इंजेक्शनच्या १०० बाटल्या बाळगणाऱ्या दोघांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2026
Spread the love

पुणे : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या दोघांना मिशन क्रॅकडाऊनच्या विशेष पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP (TERMIVA) या गुंगीकारक औषधाच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सुरज पद्माकर भुते (वय १९, रा. जगताप वस्ती, वाघोली, मूळ रा. उंब्राज, ता. कंधार, जि. नांदेड) आणि आकाश गणेश धनवटे (वय १९, रा. बारावा मैल, लोणीकंद, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून टर्मीव्हा इंजेक्शनच्या ३१ हजार ३८७ रुपयांच्या १०० बाटल्या, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख १ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे इंजेक्शन रक्तदाब वाढविण्यासाठी वापरले जाते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या इंजेक्शनची विक्री करण्यास मनाई आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक अप्पासाहेब शेकळे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई २२ जुलै रोजी रात्री सुमारे सव्वा आठच्या सुमारास वाघोली येथील आय व्ही इस्टेटमधील डीटीडीसी कुरिअर कार्यालयासमोर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वाघोली येथील आय व्ही इस्टेटमधील डीटीडीसी कुरिअर कार्यालयाजवळ दोघेजण नशेसाठी वापरले जाणारे टर्मीव्हा हे गुंगीकारक औषध बेकायदेशीररीत्या बाळगून आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तेथे सापळा रचला.

यावेळी कुरिअर कार्यालयासमोर मोटारसायकलवर थांबलेल्या दोघांकडे कुरिअरचे दोन बॉक्स असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच ते गडबडल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान बॉक्समध्ये टर्मीव्हा इंजेक्शनच्या १०० बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ३१३ रुपये असून या बाटल्या बडोदा येथील कंपनीच्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नसतानाही आरोपींनी त्या कुरिअरद्वारे मागवल्या होत्या. ३१३ रुपयांची एक बाटली ते नशेसाठी ५०० रुपयांना विकत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोराळे, पोलीस अंमलदार कुंभार आणि अशोक शेकळे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार करीत आहेत.

या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी विशेष पथकाचे कौतुक केले आहे.