लक्ष्मी फुड, सुदामाचे पोहेच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल
कामगार उपायुक्त कार्यालयाची कारवाई : बाल कामगारांना कामावर ठेवल्याप्रकरणी कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कसबा पेठेतील प्रसिद्ध सुदामाचे पोहे आणि लक्ष्मी फुड या दोन आस्थापनांमध्ये १४ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना कमी वेतनावर दररोज ८ ते १० तास कामावर ठेवून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा प्रकार कामगार उपायुक्त कार्यालयाच्या विशेष तपासणी मोहिमेत उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दुकाने निरीक्षक राजेंद्र काशिनाथ ताठे (वय ५४, रा. संगमवाडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मी फुडचे मालक अमोल दत्तात्रय पवार (वय ५५, रा. कसबा पेठ) आणि सुदामाचे पोहेचे मालक प्रशांत विश्वास डोंगरे (वय २३, रा. कसबा पेठ) यांच्याविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार उपायुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दुकानांची तपासणी करून बाल कामगार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यालगत असलेल्या दुकानांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान लक्ष्मी फुड या दुकानाबाहेरील डोसा स्टॉलवर एक अल्पवयीन मुलगा वेटर म्हणून काम करताना आढळला.
चौकशीअंती तो १३ वर्षे ६ महिन्यांचा असून मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याच्याकडून सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काम करून घेतले जात होते.
दुकानाचे मालक अमोल पवार यांनी अल्पवयीन मुलाकडून कमी वेतनात अधिक श्रमाचे काम करून घेत त्याचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर लक्ष्मी फुड शेजारील सुदामाचे पोहे या दुकानातही एक अल्पवयीन मुलगा वेटर म्हणून काम करताना आढळला. हा मुलगा मूळ उत्तर प्रदेशातील असून १४ वर्षांचा आहे.
त्याच्याकडून सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काम करून घेतले जात होते. त्याला दररोज ४०० रुपये वेतन दिले जात होते. दुकानाचे मालक प्रशांत विश्वास डोंगरे यांनीही अल्पवयीन मुलाकडून कमी वेतनात अधिक श्रमाचे काम करून घेत त्याचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे आढळून आले.
या प्रकरणी दोन्ही मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.
