आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एसटी बँकेच्या संचालकाला ४ लाखांची लाच घेताना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2026
Spread the love

पुणे : एसटी बँकेच्या बारामती शाखेतील फर्निचर नूतनीकरणाच्या कामाचे उर्वरित बिल देण्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत त्याने ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसटी बँकेच्या संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

अनिल तुकाराम बनकर (वय ५१, रा. पणदरे, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या एसटी बँकेच्या संचालकाचे नाव आहे. ते बारामती एमआयडीसी डेपोमध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदाराने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईच्या बारामती शाखेच्या इमारतीतील फर्निचर नूतनीकरणाचे काम केले होते. त्याचे ४८ लाख ६० हजार ४५५ रुपयांचे बिल झाले होते.

त्यापैकी ४० लाख रुपये मिळाले होते. उर्वरित ८ लाख ६० हजार ४५५ रुपये तसेच केलेल्या इतर किरकोळ कामाचे ४ लाख ९८ हजार रुपये मिळणे बाकी होते.

अनिल बनकर एसटी बँकेचे संचालक आहेत. ८ लाख ६० हजार ४५५ रुपयांच्या बिलाला एसटी बँकेच्या संचालकांनी मंजुरी दिली होती. त्याची ऑर्डर अनिल बनकरने आणून स्वतःजवळ ठेवली होती.

ही ऑर्डर तक्रारदाराला देण्यासाठी ४ लाख रुपये तसेच उर्वरित ४ लाख ९८ हजार रुपये मिळवून देण्यासाठी १ लाख रुपये, अशी एकूण ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.

तक्रारदाराच्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ जुलै रोजी पडताळणी केली. त्यामध्ये ८ लाख ६० हजार रुपयांच्या मंजुरीची ऑर्डर देण्यासाठी ४ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

तसेच उर्वरित ४ लाख ९८ हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी आणि ५ लाख रुपयांची डिपॉझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी २ लाख रुपये, अशी एकूण ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.

सुरुवातीला ४ लाख रुपये आणि पुढील बिल मंजूर झाल्यानंतर २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. या अनुषंगाने २३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारामती एसटी स्टँडवर सापळा रचला.

त्यावेळी स्टँडसमोरील कारमध्ये ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अनिल बनकरला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर पुढील तपास करीत आहेत.