आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2026
Spread the love

पुणे : ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका नोकरदाराची ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत कल्याणीनगर येथील एका ५५ वर्षीय नोकरदाराने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता.

चोरट्यांनी त्यांना ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले. गुंतवणूक योजना तसेच परताव्याबाबत माहिती देऊन चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी गेल्या सात ते आठ महिन्यांत त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले.

फिर्यादीने चोरट्यांच्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी ९४ लाख ४० हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर त्यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही.

हा प्रकार १० नोव्हेंबर २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.