आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळ गोळीबार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2026
Spread the love

पुणे : पूर्ववैमनस्यातून घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळ शुक्रवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्या पाठीत गोळी शिरली आहे.

ख्वाजाउद्दीन नाजीर शेख ऊर्फ नूर शेख (रा. गणेश पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुजल सुनील परदेशी आणि यश चंदन परदेशी यांचे नूर शेख याच्याशी दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते.

हे दोघे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दुचाकीवरून घोरपडे पेठ परिसरात आले होते. त्यांनी नूर शेख याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी नूरच्या पाठीत लागल्याने तो जागेवरच कोसळला.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस चौकीतील पोलीस तातडीने बाहेर आले. त्यांनी पळून जात असलेल्या सुजल सुनील परदेशी याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे एक जिवंत काडतूस आढळले असून, एक पुंगळीही मिळाली आहे. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.