आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दि पूना गुजराती केळवणी मंडळ : शतकपूर्तीचा सुवर्णक्षण

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2026
Spread the love

पुणे : २६ जुलै १९२६ रोजी शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन स्थापन झालेले दि पूना गुजराती केळवणी मंडळ यंदा आपल्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण करत शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. शतकभराच्या प्रवासात संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले आहे. मातृभाषेच्या जतनासोबतच आधुनिक शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देत संस्था आज नव्या शतकात आत्मविश्वासाने पदार्पण करत आहे. सध्या मंडळाच्या विविध संस्थांमध्ये दरवर्षी सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महाराष्ट्रातील गुजराती समाजाने व्यापारासोबत शिक्षण आणि समाजोन्नतीचे महत्त्व ओळखून २६ जुलै १९२६ रोजी या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. रावबहादूर शेठ लल्लुभाई दामोदरदास शहा, प्रा. जे. पी. त्रिवेदी, धनसुखभाई दादावाला, अंबुभाई वशी आणि गोवर्धनदास विठ्ठलदास शहा या शिक्षणप्रेमी समाजधुरीणांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. मातृभाषा, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच संस्थेची सुरुवातीपासूनची ओळख राहिली आहे.

कसबा पेठेतील फडके हौद चौकातील शैक्षणिक संकुलात प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत गुजराती व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. शेठ हकमचंद ईश्वरदास गुजराती प्राथमिक शाळा, रतनबेन चुनीलाल मेहता गुजराती हायस्कूल, इंग्रजी माध्यमातील विविध शाळा आणि आचार्य डी. बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शुल्कसवलतीच्या योजनाही राबविल्या जातात.

१९८४ मध्ये स्थापन झालेल्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए, बीबीए, बीएस्सी., बीसीएस तसेच एमएस्सी., एमकॉम. आणि पीएच.डी. संशोधन केंद्र उपलब्ध आहे. बीएस्सी. (सायबर सिक्युरिटी) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून फिनटेक, इव्हेंट मॅनेजमेंट तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

एमपीएससी आणि यूपीएससीसाठी माफक शुल्कात मार्गदर्शन उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रामुळे ग्रामीण भागासह राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळविले आहे. अनुभवी मार्गदर्शक आणि अभ्यासपूरक वातावरण ही या केंद्राची वैशिष्ट्ये आहेत.

कोंढवा येथील पी. जी. के. एम. स्कूल विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारित आधुनिक शिक्षण देत आहे. रोबोटिक्स, ओरिगामी, ऑर्गेनिक गार्डनिंग, कॅलिग्राफी, बुद्धिबळ, बहुभाषिक शिक्षण, टेक सेंटर, ब्रिटानिका लँग्वेज लॅब आणि अन्य आधुनिक सुविधांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविला जातो. तसेच कसबा पेठेत नवीन पी. जी. के. एम. स्कूल आणि PGKM Sports Academy सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेने उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि संशोधनकेंद्री अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शुल्कसवलत, आधुनिक शैक्षणिक सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची परंपरा संस्था आजही जपत आहे.

शतकभराच्या अनुभवाच्या बळावर जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारे स्वायत्त विद्यापीठ स्थापन करण्याचा मंडळाचा संकल्प आहे.

अध्यक्ष डॉ. राजेश शहा, उपाध्यक्ष जनक शहा, सचिव हेमंत मणियार, खजिनदार महेश धरोड, सहसचिव दिलीप जगड, संदीप शहा, विनोद देढिया, सहखजिनदार प्रमोद शहा, कार्याध्यक्ष संजय देसाई, कार्यकारी विश्वस्त जितेंद्र मेहता तसेच सर्व विश्वस्त, परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे संस्थेची वाटचाल अधिक बळकट झाली आहे.

‘प्रवृत्तिलक्षणो योगः’ हे ब्रीद जपत दि पूना गुजराती केळवणी मंडळ शिक्षण, संस्कार, संशोधन, कौशल्यविकास, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत नव्या शतकात अधिक व्यापक शैक्षणिक सेवा देण्यास कटिबद्ध आहे. शताब्दी महोत्सव हा केवळ भूतकाळाचा गौरव नसून भविष्याचा नवा संकल्प आहे.