आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विद्यार्थ्यांनी आवडीनुसार करिअरची निवड करावी : प्रवीण शुक्ला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2026
Spread the love

पुणे : “ज्ञान आणि शिक्षण ही अशी संपत्ती आहे, जी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअरची निवड करून निवडलेल्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करत शिक्षण पूर्ण करावे,” असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे कार्यकारी अध्यक्ष व करिअर मार्गदर्शक प्रवीण शुक्ला यांनी केले.

दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे सभासद, दिवाणजी, दलाल व हमाल कामगारांच्या कुटुंबातील दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच पदवी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. २३) सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रवीण शुक्ला बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया होते.
प्रवीण शुक्ला म्हणाले, समाजाकडून मिळणारा सन्मान हा व्यक्तीच्या कार्यातून मिळालेल्या योगदानामुळेच प्राप्त होतो.

योग्य प्रेरणा घेऊन सातत्याने प्रयत्न केल्यास परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश निश्चित मिळते. आजच्या काळात उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज नाही.

अनेक नामांकित परदेशी विद्यापीठांनी भारतातही आपले शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सहानुभूती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि प्रभावी संवादकौशल्य असल्यास भविष्यात त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतात.

त्यामुळे केवळ गुणांवर भर न देता व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व द्यावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी ईश्वर नहार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आशीष दुगड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी चेंबरच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले यांनी महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दिनेश मेहता यांनी आभार मानले, तर उत्तम बाठिया यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश फुलफगर, संदीप शहा, कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ व्यापारी जवाहरलाल बोथरा, व्यापारी वर्ग, हमाल पंचायत व दलाल असोसिएशनचे पदाधिकारी, सत्कारार्थी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.