आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एकाच परिसरात दिवसभरात दोन गोळीबाराच्या घटना

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 25, 2026
Spread the love

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील घोरपडे पेठ आणि लोहियानगर परिसरात शुक्रवारी दिवसभरात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. त्यापैकी पहिली घटना घोरपडे पेठ पोलीस चौकीपासून काही अंतरावर, तर दुसरी घटना लोहियानगर परिसरातील पीएमसी कॉलनीत सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन्ही घटनांमध्ये सहा राऊंड फायर करण्यात आले. दोन्ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या घटनेतील चारही अल्पवयीन मुले लोहियानगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यापैकी तिघे अल्पवयीन दुचाकीवरून स्वारगेटकडून पीएमसी कॉलनीत आले. त्यांचे एका व्यक्तीबरोबर सुमारे दीड महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी ते आले होते. त्यांना एका सराईत गुन्हेगाराला संपवायचे होते. मात्र, या गुन्हेगाराऐवजी त्याचा मुलगा त्यांना दिसला.

त्यामुळे त्यांनी पीएमसी कॉलनीतील गल्ली क्रमांक ३ मध्ये सुरुवातीला हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर ते गल्ली क्रमांक ९ मध्ये गेले. तेथेही त्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. यातील चौघेही जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेपूर्वी घोरपडे पेठ पोलीस चौकीसमोरील अनुसया टॉवर येथे सकाळी साडेअकरा वाजता गोळीबाराची घटना घडली होती. ख्वाजाउद्दीन नशीर शेख (वय २८, रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी सोनू ऊर्फ मोंटू अनिल परदेशी (वय २७), पियूष ऊर्फ जय अनिल परदेशी (वय २५), सुजल ऊर्फ चिम्या सुनील परदेशी (वय २१, सर्व रा. काशेवाडी), नितेश ऊर्फ बॉबी संतोष रिकीबे (वय २२, रा. घोरपडे पेठ) आणि विकी राजू परदेशी (वय ३५, रा. आनंदनगर, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, मार्केटयार्ड) यांना अटक केली आहे. त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्टसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा शेख याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा नोंद आहे. परदेशी कुटुंबातील काही आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये ते फरार होते. शेख याच्या चुलत्याने २००५ मध्ये सोनू ऊर्फ मोंटू याचे वडील अनिल परदेशी यांचा खून केला होता. त्या कारणावरून परदेशी आणि शेख यांच्यात वाद होता.

ख्वाजा हा एका नातेवाइकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोमीनपुरा कब्रस्तान येथे आला होता. तेव्हापासून आरोपी त्याच्या पाळतीवर होते. सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास तो नातेवाइकाच्या घरी जात असताना घोरपडे पेठेतील अनुसया टॉवरसमोर आरोपींपैकी सोनू परदेशी याने त्याच्याकडील पिस्तूल रोखले. ‘‘तेरे रिश्तेदार ने मेरे बाप को मारा था। तुझे भी जान से मार डालेंगे,’’ असे म्हणत शेखच्या अंगावर आणि पाठीत गोळी झाडून त्याला जखमी केले.

शेख स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथून गाडी घेऊन पळून जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर तसेच हवेत गोळीबार केला. त्याचवेळी पियूषनेही त्याच्याकडील पिस्तुलातून ख्वाजावर गोळी झाडली, तर एक गोळी हवेत झाडली. आरोपींनी ख्वाजावर तीन राऊंड फायर केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ख्वाजाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

‘ ‘पूर्वीच्या वादातून हे गोळीबार झाले आहेत. पहिल्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणाला एक गोळी लागली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. हवेत तीन राऊंड फायर करण्यात आले आहेत. या घटनेतील गोळीबार करणारे आरोपी अल्पवयीन आहेत.’’
— शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे