आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्रकार आशिष तिवारी याला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 25, 2026
Spread the love

पुणे : बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या कारला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत एक कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एका पत्रकाराला अटक केली आहे.

आशिष तिवारी (वय ३९, रा. कुदळे पाटीलनगर, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या दरोड्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर तपासाला वेग आला आहे. पोलीस अंमलदारांनाही हे प्रकरण भोवण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी यापूर्वी विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६) आणि गणेश रमेश कदम (वय ३३, सर्व रा. धायरी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.

याबाबत हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. कृष्णकृपा अपार्टमेंट, तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल ते खेड-शिवापूर पोलीस चौकीदरम्यान १८ जुलै २०२६ रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.

हर्षवर्धन पवार हे एक कोटी रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची गाडी अडवली होती. त्यानंतर एक कोटी रुपये असलेल्या बॅगा हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणात पत्रकार आशिष तिवारी हादेखील दुचाकीवरून त्यांच्या पाठोपाठ जाताना दिसून आला. त्याच्या दुचाकीमध्ये यापूर्वी या प्रकरणातील रक्कम ठेवण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस अंमलदारही अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.