आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या सेवेत लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथचा सेवायज्ञ
सलग पाचव्या वर्षी ७५० ते ८०० वारकऱ्यांना खिचडी व केळी प्रसाद वाटप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लिओ लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन यूथ यांच्या वतीने श्री भगवंत मंदिरासमोर शनिवारी (दि. २५ जुलै) सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत वारकरी भक्तांसाठी सेवाभावी प्रसाद वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सुमारे ७५० ते ८०० वारकरी भाविकांना साबुदाणा खिचडी व केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या वारकरी संप्रदायातील भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री भगवंत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. वारकऱ्यांना प्रेमाने व आदरपूर्वक प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमाचे वारकऱ्यांनी मनापासून स्वागत करत क्लबच्या सदस्यांचे कौतुक केले. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे क्लबचे डायरेक्टर लिओ-लायन यश मेहता यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ डझन केळी प्रायोजित करून उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
त्यांच्या या सेवाभावी योगदानाबद्दल क्लबतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमात क्लबचे अध्यक्ष लिओ-लायन पवन (शुभम) श्रीश्रीमाळ, सचिव लिओ-लायन उदयन सावंत, खजिनदार लिओ-लायन गौरव सुराणा, उपाध्यक्ष लिओ-लायन यश कुंकूलोळ, सर्व्हिस चेअरपर्सन लिओ-लायन आनीश श्रीश्रीमाळ, डायरेक्टर लिओ-लायन यश मेहता, तसेच लिओ-लायन आदित्य सोनिग्रा, लिओ-लायन शुभम बाफना, लिओ-लायन गोविंदराज बंडेवार आणि लिओ-लायन रोनक कुंकूलोळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी “सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. समाजसेवा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.
