प्रेमसंबंधावरुन तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुन
फुरसुंगी पोलिसांनी भावाला केली अटक : अल्पवयीन साथीदाराला घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिला पळवून नेल्याच्या संशयावरुन भावाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
तनिष्क राइकवार (वय १७, रा. हेवन पार्क, काळेपडळ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रोहित संदीप खाडे (वय २०, रा. पानसरे नगर, येवलेवाडी) याला अटक केली आहे.
याबाबत अजय हरीश राइकवार (वय ४९, रा. कोंढवा बुदु्क) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि खुन झालेला तनिष्क हे मित्र होते. तनिष्क याचे रोहित खाडे याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते.
त्याला रोहित याचा विरोध होता. प्रेमसंबंधातून तनिष्क यानेच बहिणीला पळवून नेले, या संशयावरुन रोहित खाडे व त्याच्या साथीदारांनी तनिष्क याच्या डोक्यात दगड व धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला.
ही घटना संकेत विहार येथील कचरा डेपो शेजारील लेन मध्ये शनिवारी पहाटे घडली. त्यानंतर रोहित खाडे व अल्पवयीन मुलगा सकाळीच वानवडी पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले.
त्यांनी तनिष्क राइकवार याचा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर तनिष्क याचा मृतदेह पडलेला होता.
ही घटना काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे लक्षात आल्यावर वानवडी पोलिसांनी काळेपडळ पोलिसांना कळविले. काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून रोहित खाडे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे तपास करीत आहेत.
