आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बँक खाते फ्रीज करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 27, 2026
Spread the love

पुणे : राजकोटच्या एका व्यावसायिकाच्या बँक खात्यावर किरकोळ रक्कम पाठवून त्यांचे बँक खाते फ्रीज करण्यात आले. त्यानंतर त्यांना फोन करून स्वतःला रॉचा अधिकारी असल्याची बतावणी करण्यात आली. बँक खाते सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतयाला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.

परेश प्रवीण कोठारी (वय ४९, रा. लोटस कोर्ट सोसायटी, पुणे-सातारा रोड, पंचमी हॉटेलजवळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत तुषार गोपालदास पारेख (वय ४२, रा. गोकुळ अपार्टमेंट, राजकोट, गुजरात) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार पारेख हे धान्याचे व्यापारी आहेत. परेश कोठारी हा वेगवेगळ्या व्यवसायांत गुंतवणूक करतो. तुषार पारेख यांच्या बँक खात्यात ९ मार्च २०२६ रोजी ऑनलाइनद्वारे १ हजार व २ हजार रुपये जमा झाले होते.

त्यानंतर त्यांनी ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली.

तेव्हा प्रवीण कोठारी व पुष्पा कोठारी (रा. धनकवडी) यांच्या कॉसमॉस बँकेतील खात्यातून १ हजार व २ हजार रुपये त्यांच्या खात्यावर पाठविण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले होते.

त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पैसे पाठविणाऱ्याने त्यांना फोन करून, तुमच्या खात्यावर चुकीने पैसे आले असल्याने खाते ब्लॉक केल्याचे सांगितले.

तसेच, मी रॉचा अधिकारी असून माझी पुण्यात पोस्टिंग असल्याचे सांगत त्यांच्याशी अरेरावी केली. “मी अशा प्रकारे अनेक लोकांच्या खात्यावर पैसे पाठवून त्यांची खाती ब्लॉक केली आहेत,” असे सांगत बँक खाते सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करू लागला.

त्यानंतर एप्रिल, मे व जून महिन्यापर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही. जून महिन्यात बँक खाते सुरू करण्यासाठी त्यांना पुण्यात बोलावण्यात आले. पुण्यात आल्यावर साडेचार लाख रुपये देण्याचे त्यांच्यात ठरले.

दरम्यान, त्यांचे वकील जयेश राठोड यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला होता. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना त्यावेळी पुण्यात येता आले नाही.

त्यानंतर आरोपीने धमकीचे फोन व संदेश करून २३ जुलै रोजी त्यांना पैसे घेऊन पुण्यात बोलावले. तुषार पारेख पुण्यात आल्यानंतर त्यांनी पर्वती पोलिसांकडे तक्रार दिली.

त्यानंतर पैसे घेण्यासाठी आलेल्या परेश कोठारी याला पर्वती पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.