आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी सांगता

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 27, 2026
Spread the love

पुणे : दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी सांगता समारंभाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने विकासाचे आदर्श प्रारूप देशासमोर उभे केले असून, ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर राज्याने सर्वांगीण प्रगती साधल्याचे प्रतिपादन केले.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या भव्य समारंभात महापौर मंजुषा नागपुरे, दि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा, प्रेसिडेंट संजय देसाई, व्हाईस चेअरमन जनक शहा, सचिव हेमंत मणियार, विश्वस्त जितेंद्र मेहता, किरीट शहा, सहसचिव विनोद देडीया, संदीप शहा, दिलीप जागड, प्रमोद शहा, खजिनदार महेश धारोड, विश्वस्त कीर्तीभाई शहा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचा डॉ. राजेश शहा यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची अलंकारिक मूर्ती आणि पुणेरी पगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.

या आगळ्यावेगळ्या स्वागताने कार्यक्रमात सांस्कृतिक रंग भरले. यावेळी दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शैक्षणिक शतकीय प्रवासावर आधारित ‘शताब्दी गौरव गाथा’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

तसेच मंडळाच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा घेणारा माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला.

मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘व्हायब्रंट गुजरात’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली.

उद्योग, पायाभूत सुविधा, बंदर विकास, लघुउद्योग, सेमीकंडक्टर उद्योग, हरित ऊर्जा, जलसंधारण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुजरातने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

आज भारताच्या सुमारे ४० टक्के सागरी व्यापाराचे संचालन गुजरातमधील बंदरांमधून होत असून, राज्य देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

ते पुढे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन देशासाठी प्रेरणादायी आहे.

‘एक पेड माँ के नाम’सारखे पर्यावरणपूरक उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, हायड्रोजनवर आधारित वाहतूक व्यवस्था आणि सेमीकंडक्टर उत्पादनासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत.

महाराष्ट्रात स्थायिक झालेला गुजराती समाज स्थानिक संस्कृतीशी एकरूप होत राज्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही गुजराती समाजाने समाजसेवेचा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, पुण्यातील गुजराती समाजाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ज्ञान, संस्कार आणि सेवा या त्रिसूत्रीवर कार्य करणारे दि पूना गुजराथी केळवणी मंडळ हे पुण्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मानाचे संस्थान असून, महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणातही मंडळाचे योगदान उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश शहा यांनी केले. अनुजा सेलोत यांनी सूत्रसंचालन केले, तर राजश्री पवार यांनी सरस्वती वंदना सादर केली.

जनक शहा यांनी आभार मानले. कार्यक्रमास मंडळाचे विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.