नशा करण्यासाठी इंजेक्शन बाळगणाऱ्या ५ जणांना अटक
आंबेगाव पोलिसांची कारवाई : मेफिवान इंजेक्शनचा बॉडी बिल्डिंगसाठी अवैधरित्या होतो वापर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जाणारे इंजेक्शन नशेसाठी वापरणाऱ्यांना विक्री करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या पाच जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून मेफिवान इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अथर्व इंद्रजित शिंदे (वय २४, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६, रा. सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव), पियुष गणेश भरम (वय २६, रा. कचावत चाळ, आंबेगाव) आणि लक्ष्मण परमेश्वर माने (वय ३६, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार नितीन सोनबा कातुर्डे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई २४ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कात्रज-दत्तनगर रोडवरील आनंद दरबारजवळील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तसेच पोलीस अंमलदार नितीन कातुर्डे, अजय कामठे आणि सुभाष मोरे हे परिसरात पेट्रोलिंग करत होते. ते आनंद दरबारजवळील रस्त्यावर आले असता त्यांना काही जण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच ते गडबडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अथर्व शिंदे याच्या हातातील पिशवीत काय आहे, अशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध इंजेक्शनची विक्री करण्यासाठी तेथे थांबल्याची कबुली दिली. त्याच्या पिशवीत मेफिवान (मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन)च्या ५० बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत २९४ रुपये असून, एकूण १४ हजार ७०० रुपयांच्या या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या.
अधिक चौकशीत आरोपींनी या इंजेक्शनचा वापर बॉडी बिल्डिंगसाठी तसेच नशा करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले. तसेच, ही इंजेक्शने जादा दराने विक्री करण्यासाठी ते तेथे आल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत.
