आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चांदणे गँगचा म्होरक्या गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 28, 2026
Spread the love

पुणे : मैत्रिणीवरून झालेल्या वादातून चांदणे गँगच्या टोळक्याने भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या चांदणे गँगच्या म्होरक्याला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने वानवडी परिसरात थरारक पाठलाग करून जेरबंद केले.

आकाश दत्ता चांदणे (वय २८, रा. महादेववाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खडकी मे सिर्फ चांदणे गँग राज करेगी, असे म्हणत चांदणे गँगने २९ जून रोजी खडकीतील पत्रा चाळ परिसरात राहुल राम पिवळ याच्यावर खुनी हल्ला केला होता.

या प्रकरणी खडकी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली होती. मात्र, चांदणे गँगचा म्होरक्या आकाश चांदणे याच्यासह तिघेजण फरार होते.

गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक २७ जुलै रोजी गुन्हे प्रतिबंधक कारवाई करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शशांक डोंगरे यांना गुप्त माहिती मिळाली की, चांदणे गँगचा म्होरक्या आकाश चांदणे ऊर्फ ए.सी. हा मागील दोन दिवसांपासून वानवडी परिसरात वास्तव्यास आहे.

तसेच, तो वानवडी येथील हेवन रोडवरील परांडे लॉन्ससमोर एका व्यक्तीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना देण्यात आली.

त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार जहांगीर पठाण, पोलीस अंमलदार शशांक डोंगरे, वैभव रणपिसे आणि विशाल इथापे यांनी सापळा रचला.

आकाश चांदणे घटनास्थळी येताच त्याला पोलिसांचा संशय आला. त्यामुळे त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने सार्वजनिक रस्त्यावर त्याचा थरारक पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आकाश चांदणे याने कायमस्वरूपी पुणे शहर सोडून जाण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. तसेच, खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला खडकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक वैभव मगदुम, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार जहांगीर पठाण, पोलीस अंमलदार शशांक डोंगरे, वैभव रणपिसे आणि विशाल इथापे यांनी केली.