आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाईन शॉपच्या कॅशियरला मारहाण करून लुटले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 28, 2026
Spread the love

पुणे : डीएसपी वाईन्स या दुकानातील दिवसभराची जमा झालेली रोकड मालकाकडे देण्यासाठी जात असलेल्या कॅशियरला चौघांनी वाटेत अडवून डोळ्यांत स्प्रे मारला आणि दुचाकीसह सुमारे ८ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी कॅशियर हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२, रा. पारी कंपनी चौक, नऱ्हे) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २६ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वडगाव ते वारजे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हौसकुमार इंगळे हे गेल्या सहा महिन्यांपासून नर्‍हे येथील झील कॉलेज चौकातील डीएसपी वाईन्स या दुकानात कॅशियर म्हणून कार्यरत आहेत.

ते वाईन शॉपमध्ये दररोज जमा होणारी रोकड मालक शंकर जोदवानी यांच्याकडे देण्यासाठी पिंपरीतील डांगे चौक येथील सत्यम बारमध्ये जात असतात.

दुकानाचे व्यवस्थापक शुभम पवार हे दररोज एका पिशवीत पैसे देतात. त्या पिशवीत किती रक्कम आहे, याची माहिती इंगळे यांना नसते.

नेहमीप्रमाणे २६ जुलै रोजी रात्री १०.४० वाजता व्यवस्थापक शुभम पवार यांनी दिलेली रोकड असलेली पिशवी इंगळे यांनी अॅक्टिव्हाच्या डिकीत ठेवली आणि ते निघाले.

वडगाव ते वारजे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर प्रयाजा सिटीजवळ दोन मोटारसायकलींवरून चौघेजण आले. त्यापैकी एकाने मोटारसायकल आडवी घालून त्यांच्या गाडीला कट मारल्याचा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.

अचानक त्याने हातातील स्प्रे त्यांच्या चेहऱ्यावर मारला. त्यामुळे त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर त्याने त्यांना गाडीपासून दूर ढकलले. दरम्यान, त्यांच्यातील एकाने त्यांची अॅक्टिव्हा घेऊन वारजेच्या दिशेने पळ काढला.

त्या बॅगेत ७ लाख ७६ हजार ४८० रुपये होते. दुचाकीसह एकूण ८ लाख ६ हजार ४९० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण करीत आहेत.