आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आमदार सोपल-राऊत, सुप्रसिद्ध उद्योजक ला. मालपाणी यांच्या हस्ते लिओ-लायन्स क्लबचे चार्टर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 28, 2026
Spread the love

बार्शी : लायन्स क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन युथ यांचा संयुक्त पदग्रहण, शपथविधी व चार्टर प्रदान सोहळा रविवारी देशपांडे व्हेज हॉल, उपळाई रोड, बार्शी येथे उत्साहात संपन्न झाला. डिस्ट्रिक्ट ३२३४-डी २ चे एमजेएफ लायन सुनिताताई मालपाणी यांनी इंडक्शन ऑफिसर म्हणून, तर मल्टिपल डिस्ट्रिक्ट ३२३४चे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन पीएमसीसी लायन गिरीशजी मालपाणी यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना लायन गिरीशजी मालपाणी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाचे उदाहरण देत संकटाच्या काळात शांत राहणे, योग्य निर्णय घेणे, संघभावना जोपासणे आणि सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले.

लायन्स परिवारातील प्रत्येक सदस्याने समाजहितासाठी निस्वार्थ सेवाभाव जपत समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास बार्शीचे आमदार दिलीप सोपल व विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डिस्ट्रिक्ट ३२३४-डी १ चे द्वितीय उपप्रांतपाल पीएमजेएफ लायन मंगेश दोशी, रिजन-१चे रिजन चेअरमन एमजेएफ लायन डॉ. महेश नळे तसेच झोन-३च्या झोन चेअरमन लायन अर्चना आवटे यांची विशेष उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून समाजसेवा, नेतृत्व आणि युवकांच्या सहभागातून अधिकाधिक सेवाभावी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

याचवेळी चार्टर अध्यक्ष लिओ लायन शुभम श्रीश्रीमाळ (पवन) यांनी संकल्पना व डिझाइन केलेल्या लिओ-लायन्स क्लब बार्शी टाउन युथ च्या अधिकृत क्लब पिनचे अनावरण पीएमसीसी लायन गिरीशजी मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

क्लबच्या स्वतंत्र ओळखीचे व सेवाभाव, नेतृत्व आणि युवकशक्तीचे प्रतीक असलेल्या या आकर्षक पिनचे उद्घाटन हा समारंभातील आणखी एक अभिमानास्पद आणि संस्मरणीय क्षण ठरला.

शपथविधी सोहळ्यात लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष लायन आदित्य कोठारी, सचिव लायन द्वारकेश डोईफोडे, खजिनदार लायन शिशिर मते व सहसचिव लायन प्रेमजी भानुशाली यांनी पदाची शपथ घेतली.

लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या अध्यक्षा लायन स्मिता देशमुख, सचिव लायन मालती पवार व खजिनदार लायन अंजली भानुशाली यांनी पदभार स्वीकारला.

तर लिओ-लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन युथचे चार्टर अध्यक्ष लिओ लायन शुभम श्रीश्रीमाळ (पवन), सचिव लिओ लायन उदयन सावंत, खजिनदार लिओ लायन गौरव सुराणा तसेच नूतन संचालक मंडळाने शपथ घेऊन पदभार स्वीकारला.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी लिओ-लायन्स क्लबच्या माध्यमातून युवकांना समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वाची नवी दिशा देत विविध सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, सामाजिक सेवा व जनकल्याणाचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

तर लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती देण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सोनीग्रा, रवी बजाज, मावळते अध्यक्ष लायन रवी राऊत, अमित कटारिया, सचिन बागमार, पंकज पाटील, लायन प्रकाश फुरडे तसेच लिओ लायन तेजस रायचूरकर, आदित्य सोनिग्रा, रोनक कुंकुलोळ, गोविंदराज बंडेवार आणि यश कुंकुलोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन प्रकाश फुरडे व लायन शर्वरी फुरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लायन द्वारकेश डोईफोडे यांनी केले.

कार्यक्रमास लायन्स व लिओ परिवारातील पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवाभाव, नेतृत्व, युवकशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देणारा हा संयुक्त पदग्रहण, शपथविधी व चार्टर प्रदान सोहळा बार्शीतील लायन्स परिवाराच्या सेवाकार्यातील नव्या पर्वाची प्रेरणादायी सुरुवात ठरला.